फिडे महिला ग्रँड प्रिक्स पुणे - सातव्या फेरीत हम्पीचा जायनर वर विजय आणि आघाडीत बरोबरी!
GM कोनेरु हम्पीने GM झू जायनर (चीन) हिला पराभूत करत FIDE पुणे ग्रँड प्रिक्स 2025 मध्ये एकहाती आघाडी घेतली आहे. झू जायनर हिचा हा हम्पोसोबतचा क्लासिकल फॉरमॅटमधील पहिलाच पराभव असून, वजिराच्या चुकीच्या चालीमुळे तिला हार पत्करावी लागली. हम्पीने ७ पैकी ५.५ गुण मिळवत स्पर्धेत अव्वल स्थान मिळवलं असून, ती इतर सर्व प्रतिस्पर्ध्यांपेक्षा अर्धा गुणाने पुढे आहे. IM दिव्या देशमुखने IM बटखुयाग मुंगुंटुल (मंगोलिया) हिला राजाच्या बाजूकडून जोरदार हल्ला करत चकित केलं. या विजयासह दिव्या दुसऱ्या स्थानावर पोहोचली असून तिचे ५ पैकी ७ गुण आहेत. GM आर. वैशाली आणि GM हरिका द्रोणावल्ली यांनी त्यांच्या त्यांच्या अनुक्रमे IM अलिना काश्लिन्स्काया (पोलंड) आणि IM पोलीना शुवालोव्हा यांच्याशी बरोबरी साधली. आज दुपारी ३ वाजता आठव्या फेरीला सुरुवात होणार आहे.